Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image Demo image

Tuesday, May 11, 2010

Premachi kavita

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
---------------------
Mahesh Biradar

No comments: